5 May 2026, Tue

आभासी जगामध्ये वावरतांना आपसात विसंवाद होणार नाही याची दक्षता घ्या – आ.किशोर जोरगेवार

विविध महिला संघटनांच्या उपस्थितीत ‘सायबर सेफ वुमेन’ कार्यशाला

चंद्रपूर –  सार्वजनिक जीवनात वावरताना दररोज एखादी तरी तक्रार ही सोशल माध्यमांवर फसवणूक झाल्याची असते. अनेक तक्रारी पोलिसांपर्यंत येत नाही. त्यामुळे याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असून या आभासी जगामध्ये वावरतांना घराघरात संवाद तुटणार नाही.याची काळजी घ्या,असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी आज येथे केले.

राज्यात आज पोलीस दलाच्या सायबर शाखेतर्फे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहभागात सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी एकाच दिवशी सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुली व महिलांना सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

यावेळी बोलतांना किशोर जोरगेवार यांनी उपस्थित महिला व बहुसंख्य मुलींना आपली व्यक्तिगत माहिती कुणालाच कोणत्याही अटीवर देऊ नका. माहितीची सत्यता तपासणी ही या युगाची सर्वात मोठी अडचण असून आपली कोणीतरी फसवणूक करू शकते हे ध्यानात घेऊनच सोशल मीडियाचा वापर झाला पाहिजे, असे स्पष्ट केले.

पोलीस दलाचे सायबर सेल, राज्याचे माहिती व जनसंपर्क खाते यांनी ही मोहीम प्रत्येक शाळा व महाविद्यालय स्तरावर राबवावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यावेळी उपस्थितांची संवाद साधतांना पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे इंटरनेट क्षेत्रांमधल्या होणाऱ्या फसवणुकीचा आढावा सादर केला. इंटरनेटच्या माध्यमातून आपला खाजगीपणा कशा पद्धतीने संपुष्टात येऊ शकतो व त्यासंदर्भात जिल्हा स्तरावर झालेल्या अनेक गुन्ह्यांची माहितीदेखील त्यांनी दिली. सायबर गुन्हे कसे होतात.सायबर गुन्ह्याचे प्रकार काय असतात. घटस्फोटिता, एकटया महिला, मुलींना विशेषतः कशा पद्धतीने फसविले जाते, ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने आर्थिक व्यवहारात फसविले जाते, याची उदाहरणे दिली. पोलिसांची मदत कशा पद्धतीने घ्यावी याबाबतही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी देखील यावेळी सोशल प्लॅटफॉर्मवर आपण काय गोष्टी सार्वजनिक केल्या पाहिजे, याबाबतची जागरूकता ठेवण्याचे आवाहन केले. कोणत्याही परिस्थितीत आपले पासवर्ड कोणालाही सांगू नये.तसेच त्यामध्ये वारंवार बदल करावा, तसेच खाजगी माहिती सोशल माध्यमांपासून दूर ठेवावी, या संदर्भातील मार्गदर्शन केले.

साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी महिलांनी आपल्या सुरक्षेसंदर्भात कोणती काळजी घेतली पाहिजे? याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रत्येक महिलेने स्वतःच्या रक्षणार्थ काही गोष्टी आपल्या पर्समध्ये ठेवणे किती आवश्यक आहे हे उदाहरणासह सांगितले.तसेच महिलांच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. रात्री एकट्याने काम करणाऱ्या महिलांसाठी चंद्रपूर पोलिसांनी सुरू केलेल्या सारथी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी केले.

या कार्यक्रमाला जेसीआय चंद्रपूरच्या अध्यक्ष शितल पडगीलवार, जेसीआय गरीमाच्या अध्यक्ष शितल लोहिया, जेसीआय चंद्रपुर इलाईटच्या अध्यक्ष राधिका सारडा, सर्व समान बहुउद्देशीय महिला संस्था अध्यक्ष डॉ. भारती दुधानी, फ्रेंड्स चारिटी ग्रुपचे अध्यक्ष सरिता मालू, सखी मंचच्या चंद्रपूर संयोजिका सोनल मडावी, संयुक्त महिला मंचच्या मंदा पडवेकर ,मुस्लिम एज्युकेशन संघटनाच्या शाहीन शेख, डॉ. सुनीता मुंदडा, भरत बजाज, गिरीष चांडक, प्रतीक सारडा यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायबर सेल प्रमुख तुषार चव्हाण, मुजावर अली, प्रभावती एकुरके ,इम्रान यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *