पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयूसर्स कंपनीची द्विवार्षीक आमसभा संपन्न

भोपाळमध्ये जेव्हा मी महिला कुक्कुटपालन संस्थेबद्दल ऐकले तेव्हाच मी पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी भगिनींची कुक्कुटपालन संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या महिलांनी एकत्रित येवून कुक्कुटपालनाच्या या व्यवसायाला आपल्या कर्तृत्वाचे बळ दिले. दहा वर्षानंतर या संस्थेचा आजचा 7 कोटीचा टर्नओव्हर 100 कोटीचा होईल याचा विश्वास मला आहे. मी पूर्ण शक्तीनिशी या संस्थेच्या सर्व सदस्यांच्या पाठीशी आहे. अधिकारी वर्गाने या भगिनींना सहकार्य करावे, त्यांच्या या व्यवसायात आडकाठी निर्माण केल्यास लोकशाहीच्या मार्गाने आम्ही त्याचा विरोध करू, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 27 डिसेंबर रोजी पोंभुर्णा येथे पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयूसर्स कंपनीच्या द्वितीय वार्षीक आमसभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, नगराध्यक्षा श्वेता वनकर, उपाध्यक्षा रजिया कुरेशी, गजानन गोरंटीवार, अजित मंगळगिरीवार, कंपनीच्या अध्यक्षा यमुना जुमनाके, एनएसपीडीटी चे श्री. दीपक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पोंभुर्णा येथे वीर बाबुराव शेडमाके स्मृती सभागृहाला मान्यता देण्यात आली असून येत्या एक ते दिड वर्षात या सभागृहाचे बांधकाम पूर्ण होईल. पोंभुर्णा तालुक्यासाठी एमआयडीसी वेगाने कार्यान्वीत व्हावी यासाठी आपण नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आग्रह धरला. या तालुक्याच्या विकासासाठी आपण आजवर सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले असून या पूढील काळातही हे प्रयत्न असेच सुरू राहणार असल्याचेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयूसर्स कंपनीच्या अध्यक्षा यमुना जुमनाके यांनी आपल्या मनोगतात आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनात आपण या कंपनीच्या माध्यमातुन आदिवासी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करू शकलो असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला महिलांची व नागरिकांची मोठया संख्
