26 Jun 2026, Fri

२६ जानेवारीपासून राज्यभर शिवभोजन मिळणार मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने १० रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले होते. या वचनाचीपूर्ती ही २६ जानेवारी २०२० पासून करण्यात येणार आहे. ‘शिवभोजन’ योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिलेत. आज मंत्रिमंडळ बैठकीत ‘शिवभोजन’ योजनेचा आढावा घेतला. २६ जानेवारीपासून योजनेची राज्यभर अंमलबजावणी सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. राज्यात सरकार आले तर गरीब आणि गरजूंना १० रुपयांत जेवणाची थाळी देणार अशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती. त्यांचे सराकर आल्यानंतर त्यांनी सामाईक कार्यक्रमात ‘शिवभोजन’ योजनेचा समावेश केला होता. त्याला प्राधान्य दिले होते. त्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी या योजनेवर निर्णय घेतला. त्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘शिवभोजन’ योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाने या शिवभोजन योजनेला मान्यता दिली होती.
हि ‘शिवभोजन’ योजना सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार होती. ती प्रायोगिक तत्वावर राज्यात ५० ठिकाणी सुरु करण्यात येणार होती. त्यानंतर प्रतिसाद आणि काही अडचणी आल्या तर त्या दूर करुन ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार होती. मात्र, आता ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळत ही थाळी उपलब्ध होणार आहे. शिवभोजन योजनेंतर्गत जेवणात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असून ही थाळी १० रुपयांत देण्यात येणार आहे. सुरुवातील तीन महिन्यांत ६ कोटी ४८ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला ५० ठिकाणी शिवभोजन योजनेंतर्गत १० रुपयांत जेवणाची थाळी देण्यात येणार होती. या योजनेची आता राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतल्यानंतर दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *