शेतक-यांना सिंचनाच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्याचे आ. मुनगंटीवार यांचे आवाहन

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर मुल तालुक्यातील पेठगांव-भादुर्णी-मारोडा-मुल रस्त्यावर लहान पुलालगत बांधण्यात आलेल्या आर्च टाईप बंधा-याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या बंधा-याला आज आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.
त्याचप्रमाणे मुल तालुक्यातील चिरोली गावाजवळ जानाळा-सुशी-पोंभूर्णा-चिंतलधाबा-पोडसा या रस्त्यावर अंधारी नदीवर उंच पुल बांधण्यात आलेला आहे. सदर पुलालगत बंधा-याच्या बांधकामामुळे साधारणतः 3.93 लक्ष घनमीटर पाणी साठविणे शक्य होणार असल्याने चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत रू. 193.31 लक्ष इतक्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर बंधा-यामुळे चिरोली परिसरातील चार माजी मालगुजारी तलावाच्या अस्तित्वातील वितरण प्रणालीद्वारे 723 हेक्टर शेतीचे रब्बी पिकाकरिता सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. सदर बंधा-यामुळे परिसरातील मासेमारी व्यवसायाकरिता मोठी सोय निर्माण झाली असून शेतक-यांना याचा फायदा होणार आहे.
या भेटीदरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिका-यांशी विस्तृत चर्चा केली. अशा पध्दतीचे जासतीत जास्त बंधारे बांधत शेतक-यांना शेतीसाठी सिंचनाची योग्य सोय उपलब्ध व्हावी यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी आ. मुनगंटीवार यांनी अधिका-यांना दिले.
