भारतीय मजदूर संघाच्या 17 व्या जिल्हा वार्षीक अधिवेशनाचे उदघाटन

चंद्रपूर- राज्यात आमचे सरकार असताना राज्यातील नगरपालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रथमच 409 कोटी रू. निधी अनुदान स्वरूपात अर्थमंत्री म्हणून मी उपलब्ध करून दिला, त्याचा लाभ राज्यातील हजारों नगरपालिका कर्मचा-यांना मिळाला. चंद्रपूर महानगरपालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा शासन निर्णय याच आठवडयात निर्गमित होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. हे सरकार मागील सरकारचे लोकहितकारी निर्णय मागे घेण्यातच धन्यता मानत आहे. बांधकाम कामगारांचे थांबविलेले 5 हजार रूपये पुन्हा सुरू करण्याबाबत विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात आपण सरकारला जाब विचारणार आहोत व हा निधी देण्यास सरकारला भाग पाडू. आज जरी मी मंत्री नसलो तरीही कामगार, कर्मचा-यांच्या प्रश्नांसाठी आमदार म्हणून विविध संसदीय आयुधांचा वापर करत शासनाशी संघर्ष करेन व कामगार कर्मचा-यांना न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
वेकोलि दुर्गापूर येथील सभागृहात आयोजित भारतीय मजदूर संघाच्या 17 व्या जिल्हा अधिवेशनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, 2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सर्व घटकांना न्याय देण्याचा संकल्प केला आहे. हे करत असताना कामगार क्षेत्राला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत गेली अनेक वर्षे मी सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून लढा दिला आहे. मंत्री असताना कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय आम्ही घेतले. पेपरमिल, सिध्दबली, गोपानी या उद्योगातील कामगारांना किमान वेतनाच्या प्रश्नांबाबत आपण आंदोलनाची भूमीका घेवून रस्त्यावर उतरून कामगारांना न्याय मिळवून देवू. भारतीय मजदूर संघ ही या जिल्हयातील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून पुढे यावी यादृष्टीने मी स्वतः महिन्यातुन एक दिवस भारतीय मजदूर संघाला देणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
भारतीय मजदूर संघाचे संस्थापक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त आयोजित भारतीय मजदूर संघाच्या 17 व्या जिल्हा अधिवेशनाचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंचावर भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. शैलेश मुंजे, विदर्भ अध्यक्ष रमेश बल्लेवार, कार्याध्यक्ष अशोक भुताळ, संघटन मंत्री रमेश पाटील, विदर्भ उपाध्यक्ष बंडीवार, जिल्हा महामंत्री हेमराज गेडे, मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या अधिवेशनाला भारतीय मजदूर संघाचे जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
