महाविकासआघाडी सरकारच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना ५५ हजार शेतकऱ्यांची पत्रे सादर करण्यात आली. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ग्रामीण अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबविण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी ही पत्रे राज्यपालांना सुपूर्द केली.
महाआघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी अनेक अटी घालण्यात आल्यामुळे फारच कमी शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. त्याबरोबरच महाआघाडी सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱयांना कसलीच मदत दिलेली नाही. त्याच बरोबर महाआघाडी सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाही कसलीही मदत दिलेली नाही. सत्तेत येण्यापूर्वी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रु. व फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार एवढी मदत द्या अशी मागणी करणारी मंडळी सत्तेवर आल्यावर आपण केलेल्या मागण्या विसरून गेली. आपले अपयश झाकण्यासाठी महाआघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेखही नाही. या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मा. राज्यपालांना पत्र पाठविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. ही पत्रे एकत्र करून मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी मा. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना सादर करण्यात आली.