24 Apr 2026, Fri

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

 


(शंकर महाकाली प्रतिनिधि महाराष्ट्र)
चंद्रपूर–  चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, पोंभुर्णा, सावली, बल्लारपूर, राजुरा , चंद्रपूर, नागभीड , सिंदेवाही, गोंडपीपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. बहुतांश धान उत्पादक शेतकरी असणाऱ्या भागांमध्ये झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात यावे व त्यांना तातडीने मदत करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

29 ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या पावसामुळे अनेक तालुक्यात धान उत्पादकांना फटका बसला आहे. मूल, पोंभुर्णा, सावली, बल्लारपूर, राजुरा या भागांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला धोका पोहोचला असून त्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे .त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी नुकसानाच्या संदर्भात महसूल यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावेत, असे आदेश पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नुकताच पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अशा पिकांचे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करावेत. तसेच काढणीनंतर पिके सुकवण्यासाठी शेतात पसरून ठेवण्यात आले आणि त्यानंतर शेतमालाचे नुकसान झाले असेल तर अशाही पिकांचे पंचनामे करावेत. पिक नुकसान सूचना फार्म 72 तासाच्या आत विमा कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडी वर पाठवण्यासाठी कारवाई करावी. कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या तालुकास्तरीय प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *